श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

आश्रम वृत्त

प. पू. सदगुरु योगिराज श्री गुळवणी महाराज यांचा ४६ वा पुण्यतिथी महोत्सव

प. पू.सदगुरु योगिराज श्री गुळवणी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं दि ११ ते १७ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. असंख्य साधक, भाविक भक्तांनी अत्यंत श्रध्देने या कार्यक्रमांना अलोट गर्दी केली होती.  सांप्रदायिक, वारकरी  भजन, कीर्तने, पंडित शिरीषकुमार  आणि  अजयकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन, किराणा घराण्याचे पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांचे शास्त्रीय गायन संध्याकाळच्या सत्रांमध्ये संपन्न झाले. पंडित शौनक अभिषेकी यांचे सुश्राव्य गायन ही या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची परमावधी होती. दि. १७ जानेवारी या मुख्यदिनी  पिंडदान ,स्मृतिसभा आणि शोभायात्रा भक्तिभावात संपन्न झाले.  श्री वासुदेव निवास चे प्रधान विश्वस्त प.पू. योगश्री श्री शरदभाऊ जोशी यांच्या हस्ते पिंडदान झाले. याप्रसंगी प. प. श्रीसुरेशानंदतीर्थ स्वामीमहाराज, देवास मध्यप्रदेश, प प श्रीमाधवानंदतीर्थ स्वामी महाराज, देवास आणि प प श्रीकेवलकृष्णतीर्थ स्वामीमहाराज, हरियाणा यांची विशैष उपस्थिती होती. हजारो साधक भाविकांनी पिंडदर्शन आणि महाप्रसाचा अत्यानंदाने लाभ घेतला.

प. प. श्री स्वामीमहाराजांच्या चरित्राचे कोलंबो (श्रीलंका) येथे सामूहिक पारायण

प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे तामिळ भाषेतील चरित्र श्री वासुदेव निवास ने २०१८ साली प्रकाशित केले आहे. हे चरित्र पू. रमामाता सुब्रमण्यम (चेन्नई) यांनी अनुवादित केले आहे. या चरित्राचे सामूहिक पारायण श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे नुकतेच संपन्न झाले. या आयोजनात भारत आणि श्रीलंका येथील अनेक भाविक सहभागी झाले होते. प. पू. स्वामी महाराजांच्या कार्याचा विस्तार आता भारताबाहेर आणि विशेषतः दक्षिण प्रांतात होत आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. 

०१

श्रीविष्णूसहस्त्रनाम स्तोत्र एक दिव्य अनुभूती

बुधवार दि २५ डिसें २०१९ रोजी ठाणे शहरात संपन्न झालेल्या “श्रीविष्णूसहस्त्रनाम स्तोत्र एक दिव्य अनुभूती” या कार्यक्रमाचे आयोजन ठाणेकर भक्तांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी श्रीवासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त योगश्री शरदभाऊ जोशी यांनी श्रीविष्णूसहस्त्रनामाचे पारमार्थिक महत्व विषद केले. तसेच व्यावहारिक संकटांच्या निवारणासाठीही श्रीविष्णूसहस्त्रनाम उपासना कशी केली जावी याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी ठाणे आणि मुंबई परिसरातील भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. 

योगीराज प. पू. श्री गुळवणी महाराज जयंती उत्सव

योगीराज प. पू. श्रीगुळवणी महाराज यांचा १३३ वा जयंती महोत्सव मंगळवार, २४ डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाला. ह.भ.प. श्री यशवंतबुवा कानडे यांनी जन्माख्यान यावेळी सादर केले.  

सिद्धयोग मंडळ, बडोदा ४९ वा वर्धापन दिन

योगीराज प. पू. श्रीगुळवणी महाराजांनी १९७१ साली बडोदा येथे सिध्दयोग मंडळाची स्थापना केली.  तेंव्हापासून बडोदा आणि गुजरात मधील महायोग साधकांसाठी हे केंद्र म्हणजे एक निरंतर दीपस्तंभाचे कार्य करीत आहे. या मंडळाचा ४९ व वर्धापन दिन १५ डिसेंबर रोजी श्री वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. श्रीशरदभाऊ जोशी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी श्रीवासुदेव निवास मधील श्रीगुरुमहाराजांच्या पादुकांच्या पूजनाचा आणि दर्शनाचा लाभ बडोदावासियांना झाला. कार्यक्रमास श्रीवासुदेव निवासचे विश्वस्त श्री देविदास जोशी महाराज यांचीही उपस्थिती होती. 

 १९७१ साली सिद्धयोग मंडळाच्या स्थापनेवेळी घेतलेले छायाचित्र. मध्यभागी योगीराज श्री गुळवणी महाराज 

श्री दत्तजयंती महोत्सव २०१९

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी  दत्तजयंती उत्सव सोहळा श्री वासुदेव निवास मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि. ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१९ या दरम्यान संपन्न झालेल्या या सोहळ्यात जयलाभ स्तोत्र, गुरु स्तुती यासह श्री दत्तभावसुधारस, विष्णूसहस्त्रनाम यांचे सामुहिक पठण झाले. संपूर्ण उत्सवादरम्यान अखंड वीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यदिनी म्हणजे ११ डिसेंबर रोजी हा. भ. प. श्री यशवंतबुवा कानडे यांचे सुश्राव्य जन्माख्यान झाले. संध्याकाळी श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांचा १२७ वा जयंती महोत्सव

दक्षिणेत महयोगाची गंगा अवतीर्ण करणारे प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांचा १२७ वा जयंती महोत्सव श्री वासुदेव निवास मध्ये मोठ्या भक्तिभावाने आज १६ में २०१९ रोजी संपन्न झाला. मुख्य कार्यक्रमास प.प.श्री शिवोम् तीर्थ स्वामीजींचे पूर्वाश्रमीचे सुपुत्र प.प.श्री निजानंदतीर्थजी महाराज, रायसेन-हरियाणा (सर्वात डावीकडे) प.प.श्री चेतनविलासतीर्थजी – नवाली आश्रम मुंबई (मध्यभागी) उपस्थित होते. श्रीवासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प.पू. श्री शरदशास्त्री जोशी महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन केले.

loknath-teerth-swami-127-jayanti

औरंगाबाद येथे सामुहिक साधना आणि मार्गदर्शन

औरंगाबाद येथील ज्येष्ठ साधक आणि दिक्षाधिकारी प.पू. श्री गोविंदराव पुंडकाकांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त औरंगाबाद येथे श्रीवामन निवासात दि. ६/५/२०१९ व ७/५/२०१९ असा दोन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. श्री शरदशास्त्री जोशी महाराज यांच्या उपस्थितीत सामुहिक साधनेचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक बैठकीनंतर प.पू.श्री. शरदरावजी जोशी महाराज प्रधान विश्वस्त श्रीवासुदेव निवास पुणे यांनी साधकांच्या साधनेतील प्रगतीसाठी उपासनेचे महत्व आणि साधकाचा आदर्श दिनक्रम व आचरण याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.उपासनेने बाह्य मनाची शुद्धी होते तर साधनेने अंतर्मनाची शुद्धता होते असे सांगून त्यांनी नित्यउपासना व नित्यसाधनेचे महत्व अधोरेखित केले. प.पू. पुंड काका यांच्या सहवासातील आठवणी,त्यांची शास्त्रनिष्ठा व आचरण इ.बाबी विदित केल्या.

याच कार्यक्रमात प.पू. योगीराज श्रीगुळवणी महाराज यांच्या ‘योगीराज’ या चरित्रग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे विमोचन करण्यात आले.याप्रसंगी प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट नाशिक चे विश्वस्त श्री.बाळासाहेब देशपांडे,औरंगाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष श्री.प्रकाश कुलकर्णी बोरगावकर ,श्री सुहास जोशी उपस्थित होते.यावेळी शिष्यपरिवार व साधकवर्ग मोठ्या संख्येने जमला होता.

aurangabad-1
aurangabad-2

प. प. श्रीनारायणस्वामी महाराज चरित्रग्रंथाचे प्रकाशन

narayanswami-charitra-prakashan

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनारायणस्वामी महाराजांच्या २१४ व्या पुण्यतिथीउत्सवाच्या पहिल्या दिवशी २८ एप्रिल २०१९ रोजी श्री वासुदेव निवास आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्रीनारायणस्वामी मठात प. प. श्रीश्रीनारायणस्वामी महाराजांच्या चरित्रग्रंथाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन प्रकाशन संपन्न झाले. श्री वासुदेव निवास येथील कार्यक्रमास प्रधान विश्वस्त प. पु. श्री शरदशास्त्री जोशी महाराज, विश्वस्त श्री आनंद कुलकर्णी, डॉ. प्र. ना दीक्षित, श्री प्रकाश पुजारी, श्री सुरेंद्र पेळपकर, श्री प्रकाश कामत उपस्थित होते. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री वासुदेव निवासचे विश्वस्त श्री देविदास जोशी महाराज यांनी श्रीचरणी स्वामी महाराजांचा चरित्र ग्रंथ अर्पण केला.

मा. भैयाजी जोशी, (सहकार्यवाह रा. स्व.संघ) यांच्या हस्ते

अमृताचा अथांग सागर या ग्रंथाचे अनावरण

सोमवार दिनांक ८ एप्रील २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता मनोहर मंगल कार्यालय पुणे येथे श्री वासुदेव निवास पुणे व विवेक साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे जीवन व त्यांचे वाङ्मय दर्शन घडविणारा ‘अमृताचा अथांग सागर’ या ग्रंथाचे अनावरण करण्यात आले. ग्रंथ प्रकाशन माननीय भैयाजी जोशी, (सहकार्यवाह रा. स्व.संघ), प.पू. शरद ज.जोशी महाराज (प्रधान विश्वस्त श्री वासुदेव निवास),व श्री राजेश मालपाणी (प्रसिद्ध उद्योजक) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्री प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांचे वाङ्मय अमृतासमान आहे तसेच ते अक्षय आणि अविनाशीही आहे. श्री महाराजांची ग्रंथसंपदा विपुल आहे. या प्रकाशित ग्रंथातून सुमारे ३३ मान्यवर लेखकांनी प.प. श्री स्वामींमहाराजांचे तत्वज्ञान मांडले आहे. हे विपुल ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत जावे व त्यांचे कार्य व थोरवी पोहोचावी हाच उद्देश या मागचा होता. प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. अनेक कार्यकर्ते व लेखकांना सन्मानीत करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या ग्रंथाच्या अध्ययनातून सर्वसामान्यांच्या मनात प.प. श्री स्वामींमहाराजांच्या वाङमयनिर्मितीविषयी, व त्यांच्या विचारांविषयी उत्सुकता, ओढ आणि जागरुकता निर्माण होईल हे निश्चित.

vivek