श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे
sadguru-sadhak-susanwad

सद्गुरू साधक सुसंवाद

महायोगाची गंगा प्रवाहित करणारे श्रीवासुदेव निवासचे संस्थापक योगीराज श्रीगुळवणी महाराज आणि जिज्ञासूंमध्ये महायोगाविषयी झालेल्या सुसंवादाचे निवडक संकलन  

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीतेत आणि माउली श्रीज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये प्रतिपादन केलेला, हठ, राज, मंत्र, लय, अष्टांग या सर्व साधनमार्गांना व्यापून टाकणारा हा महायोग आहे. यालाच कुंडलिनी योग, शक्तिपात योग, सिद्धयोग, असेही म्हणतात.

कुंडलिनी शक्ती जागृत होते याचा अर्थ ती पूर्वी निद्रिस्त होती असा रूढ अर्थ इथे अपेक्षित नाही. कुंडलिनी शक्ती, (प्राण शक्ती) जागरणापूर्वी बहिर्मुख अवस्थेत असते, ती केवळ भौतिक व्यवहार करत असते. शक्तिपात दिक्षेनंतर अर्थात कुंडलिनी जागरण दिक्षेनंतर ती अंतर्मुख होते. पूर्वीची बहिर्मुख शक्ती आता साधकाच्या अध्यात्मिक उन्नतीचे कार्य करू लागते. त्याच्या देहाची, मनाची, प्राणाची शुद्धी करू लागते. शेवटी त्याला खऱ्या ज्ञानाचा, मुक्तीचा लाभ ती करवून देते. योगशास्त्रानुसार कुंडलिनी शक्तीचे वास्तव्य मुलाधारामध्ये असते. (पाठीच्या कण्याचे खालचे टोक) तिचे वर्णन नागिणीच्या पिलासारखे केले गेले आहे. जागरणापुर्वी कुंडलिनी शक्ती साडेतीन वेटोळे घालून मुख खालच्या दिशेला करून सुप्त अस्वस्थेत असते. (अधोमुखी असते) शक्तिपात दिक्षेनंतर ती जागृत होते त्यानंतर ती आपले मुख वरच्या दिशेला करते म्हणजेच उर्ध्वमुखी होते. या क्षणापासून साधकाचा खऱ्या अर्थाने अध्यात्मिक प्रवास सुरु होतो.

मंत्रानुष्ठान, प्राणायाम, उत्कट सात्विक कर्म, ईश्वराची भक्ती, अथवा पूर्वपुण्य यामुळे सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत होते. या सर्व प्रकारांमध्ये साधकाला स्वतःला नानाविध प्रयत्न करावे लागतात, आत्यंतिक कष्ट घ्यावे लागतात. शक्तिपात योगामध्ये मात्र कुंडलिनी शक्ती जागृतीची तीव्र तळमळ लागलेल्या साधकाला सदगुरुंच्या कल्याणकारी संकल्प शक्तीने विनासायास शक्ती जागरणाचा अनुभव येतो.

इतर साधना आणि शक्तिपात साधनपद्धती मधील फरक एका दृष्टांताद्वारे समजून घेवू. एकाला भोजनासाठी खूप खटपट करावी लागते. उदा: अन्नसामुग्री गोळा करणे, लाकूडफाटा गोळा करून विस्तव पेटविणे, त्यावर स्वयंपाक करणे आणि शेवटी भोजन करणे. या सर्व बाबी त्यालाच कराव्या लागतात. दुसऱ्याला मात्र कसलाच खटाटोप करावा लागत नाही. कोणीतरी त्याच्यासाठी अन्न शिजवून तयार ठेवलेलेच असते. वेळ झाली की पानावर बसायचे आणि जेवायचे एवढेच त्याला करावे लागते. या दोन पैकी शक्तिपात साधनमार्ग हा दुसऱ्या प्रकारचा आहे. शक्तिपात मार्गातील साधकासाठी जे जे आवश्यक असते ते गुरुशक्ती स्वतःच करते. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आसनावर स्वस्थ बसून डोळे मिटणे आणि मिळणारा अनुभव घेणे एवढेच या परंपरेतील साधकाला करावे लागते.

मानवाच्या ठायी असलेले मन आणि त्याची बुद्धी हे शब्द उच्चारायला जितके सोपे तितकीच त्यांची शक्ती व वृत्ती ईश्वरचरणी लीन होणे अवघड आहे. परंतु शक्तिपात दिक्षा थेट मनावर आणि प्राणावर हळुवार आघात करते. आतूनच त्यांच्यावर प्रभाव पाडते आणि त्यांना वाकवते. इतर साधनमार्गाच्या तुलनेत शक्तिपात साधनेत ही प्रक्रिया विजेच्या वेगाने होते. उदबत्तीचा चटका आणि विजेचा झटका यांच्या तीव्रतेमध्ये फरक हा असणारच. अर्थात हा वेग प्राप्त करण्यासाठी साधकाचे अथक प्रयत्न आणि शरणागत वृत्ती मात्र आवश्यक आहे.

शक्तीपात योगाची साधना ही एक विलक्षण साधना आहे. यात साधकाला स्वतःहून विशिष्ठ देवतेचे ध्यान, अनुष्ठान, जप करायचा नसतो. दिक्षेनंतर साधकाने साधनेसाठी स्वतः ठरवलेल्या सोयीच्या वेळी हात पाय धुवून, चूळ भरून साधनेसाठी अंथरलेल्या आसनावर डोळे मिटून साधी मांडी घालून स्वस्थ बसायचे असते. डोळे मिटल्यानंतर आपली कुलदेवता, इष्टदेवता, ज्यांच्यावर श्रद्धा आहे असे संत सत्पुरुष, शक्तिपात दिक्षा मिळालेल्या परंपरेतील महापुरुषांचे आणि आपल्या दिक्षागुरूंचे स्मरण करून स्वस्थ बसावे. यानंतर मात्र स्वतःहून कोणत्याही देवतेचे ध्यान करू नये. आपल्या श्वासांकडे लक्ष द्यावे. दिक्षेमुळे जागृत झालेली कुंडलिनी शक्ती आता स्वतःहून साधकाची साधना करून घेवू लागेल. साधक डोळे मिटून बसला की त्याला त्याच्या आंतरिक अवस्थेप्रमाणे नानाविध अनुभव यायला लागतील. बसल्या ठिकाणी डोलणे, शरीर कंप पावणे, श्वासांची गती बदलणे असे अनुभव यायला लागतील. साधकाला आपोआप विविध प्राणायाम, हठ्योगातील विविध बंध, मुद्रा, भ्रस्त्रिका, आसने व्हायला लागतील. कधी न म्हटलेले मंत्र, स्तोत्र, काव्य यांचे स्फुरण होऊ शकते. अनाहत ध्वनी, दूरश्रवण, देवता दर्शन, तेज, रंग दिसणे, सुगंध येणे अशा विविध प्रकारच्या अनुभूती साधनाच्या दरम्यान येवू शकतात. साधनेच्या काळात येणारे अनुभव साधकपरत्वे वेगवेगळे असू शकतात. काही साधक केवळ शांत बसतात. त्यांना कोणतीच बाह्य क्रिया होत नाही पण साधनेनंतर विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे ते सांगतात. रोजची साधना झाली की उत्साह वाटतो, मन शांत राहते, आकलन शक्ती, सारासार विवेक बुद्धी वाढल्याचे लक्षात येते. खरे म्हणजे शक्तिपात योगाच्या साधकाला स्वताहून काहीच करायचे नसते, केवळ साधनावर जाऊन बसणे एवढीच त्याची जबाबदारी असल्याने या साधनेला ‘बैठक’ असेही म्हटले जाते.

साधनेची जागा एकांतात असावी. मोकळी असावी. ही जागा पवित्र ठेवावी. तिथे इष्टदेवतेचे उत्तम असे चित्र असावे, धूप, उदबत्तीच्या सुगंधाने तिथले वातावरण शुद्ध करावे. खोली लहान असली तरी साधनेची जागा वेगळी असावी, तीच जागा कायम असावी. साधनेच्या या जागी व्यावहारिक वर्दळ असणार नाही असे पहावे. किमान साधनेच्या वेळी तरी तिचे वेगळेपण जपावे. परंतु रात्री, मध्यरात्री, किंवा उत्तररात्रीची साधना आपल्याच अंथरुणावर केली तरी हरकत नाही. आपले अंथरूण स्वच्छ असावे. साधनेसाठी आसन जाड, मउ असावे. आसन घालताना व्यवस्थित मांडी घालून बसता येईल इतपत लांब-रुंद असावे. आसन जमिनीवरच असावे. पाट अथवा पलंगावर नसावे. आसनावर बसताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे.

नियमित एकच ठराविक वेळ साधनेसाठी असावी. साधन वाढत जाईल तसतसा साधनेचा कालावधी आवश्यकतेप्रमाणे वाढवावा. आपले व्यवहार सांभाळून वेळेची योजना असावी. पहाटेची वेळ साधनेसाठी सर्वोत्तम, सकाळ, संध्याकाळ या वेळाही साधनेला अनुकूल आहेत. मध्यरात्री एक झोप झाल्यावर साधनेस बसणे फार लाभदायक असते. जेवल्यानंतर दोन अडीच तास साधना करू नये. साधना होईल तेवढी व होईल तितक्या वेळा करणे केंव्हाही चांगले. वेळेचे बंधन स्वतः घालू नये.

सदगुरुनी दिलेला मंत्र किंवा इष्टदेवतेचा नामजप किंवा श्रीगुरूंचा नामजप किंवा सोsहं हा जप श्वासाबरोबर करावा. दिवसभराचा बाकीचा व्यवहार नेहमीप्रमाणे चालू ठेवावा. व्यवहारात सात्विकतेला प्राधान्य असावे
साधनेसाठी शरीर अनुकूल राहावे, यासाठी सात्विक आणि मर्यादित आहाराचे सेवन करावे. जागरण, अति प्रवास, अति आहार, अति उपवास, करू नये. तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. साधकाने प्रयत्नशून्य असून चालत नाही. साधनेच्या उन्नतीसाठी साधकाने डोळस आणि अनुकूल-सहाय्यक प्रयत्न केले पाहिजेत. साधनेविषयी मनात शंका आणि संशय ठेवू नये. शक्तिपात साधना सर्व दृष्टीनी अत्यंत अपूर्व आहे अशी श्रद्धा असावी. परमार्थाविरुद्ध मनात येणाऱ्या प्रतिकूल, अनिष्टकारी कल्पनांना थारा देवू नये. आळसाचा त्याग करावा. अतिरंजित कल्पनेत आणि भ्रांतीदर्शन यामध्ये अडकून पडू नये.
आंबट पदार्थ, रसहीन, बाजारू खाद्यपदार्थ, कांदा-लसूण अति तेलकट, अति तिखट पदार्थ, तसेच मादक पदार्थ, मांसाहार वर्ज्य करावा. फार प्रवासी असू नये. विनाकारण चिंता करू नये. मैथुनकर्मात संयम बाळगावा. भाराभर ग्रंथ वाचन करून मनात गोंधळ निर्माण करू नये. लोकनिंदा, आत्मस्तुती करू नये. अमंगल, अपवित्र वस्तू, स्थान, अन्न वर्ज्य करावे. कोर्ट कचेऱ्या-तंटे यामध्ये रस घेवू नये.
उठण्याची घाई करू नये. न उठता पुन्हा डोळे मिटावेत. साधन चालू असल्याचे लक्षात येईल. साधन पूर्ण झाल्यावर उठावेसे वाटेल. 
साधन चालू असताना येणारी ही अवस्था म्हणजे निद्रा नाही. ही स्थिती अधिक काळ राहिली पाहिजे. त्याने चित्त शांत होईल.
शक्तिपात साधनेत अंतर्मनातील सुप्त संस्कार जागे झाल्याने कधी काय होईल हे सांगणे कठीण आहे. मात्र हे सर्वच खरे असेल अथवा होईल असे मात्र नाही. आपल्याला दिसलेली घटना, व्यक्ती, स्थान खरी आहे किंवा नाही याविषयी शोध घ्यावासा वाटेल पण साधकाने अशा गोष्टीत लक्ष घालू नये. आसनावर ज्या क्रिया होतील, दृश्ये दिसतील ती चित्रपट पहिल्यासारखी फक्त साक्षीभावाने पहावीत.
साधनेत स्वतः प्रयत्नपूर्वक नामस्मरण किंवा कुठलीही क्रिया करू नये, तथापि नामस्मरण अंतःस्फुर्तीने, आपोआप होत असेल तर ते होवू द्यावे.
साधनेचा अभ्यासच केला नाही तर दिक्षा घेवून काय उपयोग? साधन केले तर अडीअडचणी, प्रश्न सुटत जातील. केवळ प्रश्न विचारून अथवा अडचणी सांगून काही उपयोग होणार नाही. साधना तुमच्या सोयीने केंव्हाही करा पण करा! ‘साधन नाही तर भोजन नाही’ असा एक नियम करावा म्हणजे वेळेचा प्रश्न उद्भवणार नाही.
शक्तिपात योगाच्या साधकाला उपवासादी कष्ट सहन होत नाहीत. फार उपवास न करता एकादशीसारखा एखादा उपवास पुरेसा आहे.
सर्व संत महापुरुष एकच आहेत ही भावना वाढीस लागावी हा अशा दर्शनामागचा हेतू असतो. दुसरे म्हणजे ज्यांच्यांवर आपली भक्ती आहे, आपला काही पूर्वसंबंध आहे अशा संतांच्या रुपात दर्शने देवून ती कुंडलिनी माता आपली श्रद्धा विकसित करत असते.
मनाला स्वास्थ्य लाभणे, सारासार विचार आणि विवेक बुद्धी जागी होणे, शारीरिक व्याधी दूर होणे हे लाभ व्यावहारिक मानले तर ते अवश्य मिळतील. यांच्या योगाने मिळणारे इतर फायदेही आपसूकच होतील.
साधनेचा सुपरिणाम आपल्या आचरणात दिसणे महत्वाचे आहे. दिवसेंदिवस दैवी संपत्ती वाढत गेली पाहिजे. आपल्या वर्तनात, चित्तवृत्तीमध्ये चांगला बदल होतो आहे असे स्वतःच्या आणि इतरांच्या लक्षात येत असेल तर साधन योग्य दिशेने चालू आहे असे समजावे.
साधनाभ्यासाला जितका वाव आणि वेळ मिळायला हवा तितका मिळत नसणार. त्यामुळे एकांत मिळताच साधन सुरु होते. ठरलेल्या वेळी पोटभर जेवल्यानंतर अवेळी खाण्याची इच्छा होत नाही तसेच हेही आहे.
नेहमीच नवीन नवीन क्रिया होतील असे नाही. जे चालते आहे ते उत्तमच या भावाने साधन करावे. साधनेतील पुढील वाटचालीसाठी शरीराची, मनाची आणि प्राणाची तयारी झाली की क्रियांचा प्रकार बदलेल. तोपर्यंत कंटाळून चालणार नाही. साधनाचा वेग वाढविण्यासाठी आहार-विहार-विचार यांचे नियमन आवश्यक असते.
घरच्या कामांमुळे बैठकीस वेळ मिळू शकत नाही हे खरे आहे. आपल्यामुळे इतरांची गैरसोय होणार नाही इकडे लक्ष असावे. आपल्या साधनेला अमुकच वेळ लागते असे नाही. पहाटे, दुपारी, रात्री कोणतीही सोयीची वेळ ठरवावी. किंवा वेळ मिळेल त्याप्रमाणे थोडा-थोडा वेळ पण अनेक वेळा साधनेची बैठक करण्यास हरकत नाही. फक्त भोजनानंतर दोन-तीन तास बैठक करू नये.
ज्यांच्या-ज्यांच्या कडून अध्यात्मिक उन्नतीला उपयोग होत असेल तर अवश्य करून घ्यावा. मात्र आपणास प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या मार्गाविषयी मनात किंतु बाळगण्याचे कारण नाही. मनात अशा प्रकारचे विचार येणे म्हणजे आपली भूमिका अद्याप पक्की झाली नसल्याचे आपणच आपल्याला बजावावे.