प.प. श्रीगंगाधरतीर्थ स्वामी महाराज महाराज चरित्र सारांश
प.प. श्रीगंगाधरतीर्थ स्वामीमहाराज म्हणजे शक्तिपात योग परंपरेचा अगदी अलीकडचा अत्यंत दैदिप्यमान नंदादीप. या नंदादीपाने एकच ज्योत पेटवली नी दिव्य परंपरा अखंड प्रकाशित राहण्याचा समर्थ आशीर्वाद दिला. स्वामींचे सारेच जीवन नंदादीपासारखे होते. अखंड प्रकाश, शांतता व प्रसन्नता देणारे होते. त्यांच्या जीवनात कुठे ही धावपळ, ये-जा किंवा तीर्थयात्रा नाही. उग्र तप:साधनेचा खळखळाट नाही. जीवनाला प्रसिद्धीचा वारा लागला नाही.
अहंकाराचा स्वप्नातही स्पर्श न झालेले स्वामींचे जीवन होते. स्वामींच्या या उदात्त जीवनाचा काहीच पत्ता लागू शकत नाही. स्वामीमहाराजांचे पूर्वाश्रमीचे नांव आणि जीवन यांची माहिती बिलकुल उपलब्ध नाही. जीवन काळ म्हणाल तर साधरणपणे इ.स.१८४० ते १९०८ हा आहे. इतक्या अलीकडच्या काळात विज्ञानयुगात एखादी व्यक्ती स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकते आणि समाज त्यांना ओळखू शकत नाही हे आश्चर्य आहे. प्राचीन काळी तर असंख्य महापुरुष अज्ञात राहिले असतील यात नवल कसले? स्वामींचे मूळ घराणे वाजपेयी ब्राम्हण शाखेचे होते. प्रभू रामचंद्रांच्या पुण्यवान अयोध्या नगरीचे ते निवासी होते. स्वामींचे पूर्वाश्रमीय जीवन पूर्णपणे अज्ञात आहे. ते विवाहबद्ध झाले किंवा नाही? व्यवसाय केला असेल तर कोणता? नसेल केला तर काय केले असेल? कौटुंबिक स्थिती कशी असेल? ज्या कुळात या महापुरुषाचा जन्म झाला त्या कुलाची परंपरा, त्या कुळाचे दैवत – उपासना कोणती असेल? यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर केवळ मौनानेच देणे शक्य आहे.
एवढे मात्र खरे की, स्वामीजींनी तरुणपणीच घर सोडले, संसार सोडला आणि हिमालयाचा आश्रय घेतला. संन्यास घेण्यापूर्वीच हे घडले होते. विरक्त जीवनाची ओढ त्यांना संसारात ठेवू शकली नाही. श्रीस्वामी कोणालाही न सांगता हिमालयात निघून गेले. हिमालयात त्यांना संन्यासवेषधारी विभूती भेटली. यासंबंधी श्री स्वामींनी एवढेच सांगितले कि, माझ्या गुरुदेवांनी शक्तिपात दीक्षा दिली. अचानक भेटले मला गुरुदेव आणि मला दिव्य विद्या दिली. साधनमग्न राहण्यास सांगितले, मंगल आशीर्वाद दिला. देणारा दत्त असतो, घेणारा भक्त असतो. त्या विभूतीने दिव्य विद्या देऊन या भक्ताला कृतार्थ केले. योग्य मार्गदर्शन करून ती विभूती निघून गेली ती पुन: स्थूलरूपाने कधीही भेटली नाही.
ही घटना अलौकिक होती. पण याचा उल्लेख यापेक्षा अधिक त्यांनी कधी केला नाही. आपला हिमालयातील उद्देश सफल झालेला पाहून श्रीगंगाधरतीर्थांनी परत फिरण्याचा बेत केला. ते परत घराकडे अयोध्येला न जाता जगन्नाथपुरीस गेले. संन्यास घेण्यासाठी ते गोवर्धन पीठात गेले. त्या ठिकाणी काही काळ मुक्काम करून त्यांनी विधिवत् संन्यास ग्रहण केला. प.प.श्रीगंगाधरतीर्थस्वामीमहाराज हे नाव या आश्रमाचा स्वीकार केल्यानंतर प्राप्त झालेले आहे.
स्वामी महाराज मितभाषी होते. गप्पागोष्टी, बोलणे, शास्त्रचर्चा इ. त्यांना पसंत नसत. ते अत्यंत एकांतप्रिय होते. त्यांनी आपल्याभोवती शिष्यपरिवार वाढविला नाही. गोवर्धनपीठाच्या आश्रमातील गर्दी सुद्धा नकोशी वाटे आणि त्यासाठीच त्यांनी जगन्नाथपुरीमध्ये चंदन तलावाच्या काठावर एक छोटीशी झोपडी बांधून तेथे आपले वास्तव्य केले. ते आपल्या झोपडीच्या बाहेर फारसे पडत नसत. भिक्षेसाठी स्वतः जात नसत. त्यांचे जवळ १-२ ब्रह्मचारी शिष्य होते. ते भिक्षा मागून आणीत आणि स्वामींची भिक्षा त्यातून होत असे. ते साधनेत रमलेले असत. त्यांनी आपला व्यक्तिगत परिचय कोणालाही करून दिला नाही व अध्यात्मसंपन्न जीवनाची जाणीव कोणालाही होऊन दिली नाही. लोक त्यांना अत्यंत साधा साधू म्हणून समजत. त्यामुळे त्यांचेकडे लौकिक अपेक्षेने कोणी गेलेच नाही.
स्वामी महाराजंचे एकमेव शिष्य म्हणजे प.प.श्रीनारायणतीर्थस्वामीमहाराज, यांच्यामुळेच श्रीगंगाधरतीर्थ स्वामीमहाराज थोडेसे प्रकाशात आले. प.प.श्रीगंगाधरतीर्थ स्वामीमहाराजांचे खरे अलौकिक, भव्य विभूतीत्व, दिव्यगुरुत्व त्यांच्या एकमेव शिष्याच्या जीवनचरित्रामधून प्रत्ययास येते.
प.प श्रीनारायणतीर्थस्वामीमहाराज यांना एकदा आपल्या श्रीगुरुदेवांची एकसारखी आठवण येऊ लागली. त्या केवळ स्मरणाने ते अतिव्याकुळ झाले आणि त्यांनी आपल्या श्रीगुरुदेवांना पत्र पाठविले. परंतु तत्पूर्वीच श्रीगुरुदेवांचे लौकिक अस्तित्व अनंतात विलीन झालेले होते. हे दुसऱ्या भक्ताच्या आलेल्या पत्रावरून समजले. हा १९०८ चा काळ होता.
|आदिनाथ,परात्पर श्रीगुरुदेव श्रीमत् परमहंस परिव्राजिकाचार्य १००८ श्रीगंगाधरतीर्थस्वामीमहाराजांचे चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात |