श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

प.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज चरित्र सारांश

loknath-tirth-swamiप.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांचा जन्म रविवार ८ मे १८९२ रोजी सध्याच्या बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरात चक्रवर्ती घराण्यात झाला. चक्रवर्ती हे ढाक्यातील प्रसिद्ध श्रीढाकेश्वरी मंदिराचे पुजारी होते. प.प. लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव योगेशचंद्र होते. बालपणापासूनच त्यांना कालीमातेच्या उपासनेचे आकर्षण होते. ढाकेश्वरी मंदिरातील एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी बसून ते गुपचूप कालीमातेचे ध्यान दिवस-दिवस करीत असत. बालपणीच माता पित्यांचे छत्र हरपल्यामुळे त्यांना पाचव्या इयत्तेतच शिक्षण सोडावे लागले.

आता मात्र सदगुरू प्राप्तीची त्यांना आर्तता लागली. कालीमातेच्या कृपेने त्यांना प.पू. आत्मानंद ब्रह्मचारी यांच्या रुपात सदगुरू प्राप्ती झाली. त्यांनी योगेशचंद्र यांना प्रथम ब्रह्मचर्य आणि नंतर कुंडलिनी महायोग अर्थात शक्तिपात दीक्षा दिली.

योगेशचंद्र यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी सन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर त्यांचे नाव ‘स्वामी श्रीचिन्मयानंद सरस्वती’ असे झाले. यानंतर प.प. स्वामी महाराजांनी हिमालयात टिहरी-गढवाल च्या जंगलात सलग दोन वर्ष कठोर साधना केली. त्यांची साधना पूर्ण सिध्द झाल्याने साक्षात महाकाली जगदंबेने त्यांना दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार प.प. स्वामी महाराजांनी हिमालय सोडले आणि ते दक्षिणेकडे निघाले. भगवती मातेने घडवलेल्या अनेक नाट्यमय घटनांनंतर प.प. स्वामी महाराजांची भेट प.पू श्री वामनराव गुळवणी महाराज यांच्या बरोबर मध्य प्रदेशात होशंगाबाद येथे झाली. त्यापूर्वी प.पू श्री वामनराव गुळवणी महाराजांनी हठयोगाच्या मार्गाने कुंडलिनी शक्तीच्या जागरणाचे अनेक आटोकाट प्रयत्न केले होते पण त्यात यश काही मिळाले नव्हते. पण प.प. स्वामी महाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा देवून क्षणार्धात शक्ती जागरणाचा परमोच्च अनुभव दिला.

प.प. स्वामीमहाराजांनी ३०-१ १९२७ (पौष वद्य दशमी) रोजी दंडी सन्यास ग्रहण केला. त्यानंतर त्यांचे नाव ‘स्वामी श्रीलोकनाथतीर्थ’ असे झाले. परमहंस परिव्राजक श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचे संपूर्ण जीवन कालीमातेने संचालित केलेले होते. तिच्या आज्ञेशिवाय ते कोणतीही गोष्ट करत नसत. प.प. श्रीस्वामीमहाराज चमत्कार करण्याच्या विरोधात होते तथापि कालीमातेच्या कृपेने त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या त्यांचा उपयोग करून अनेक भक्तांच्या विविध समस्या त्यांनी दूर केल्या.

त्यांनी परिव्राजक अवस्थेत संपूर्ण भारतभर भ्रमण केले. महाराष्ट्राविषयी त्यांना विशेष ममत्व होते. महाराष्ट्रात बार्शी, पुणे येथे त्यांनी अनेक भक्तांकडे वास्तव्य केले होते. प.पू. श्री गुळवणी महाराजांवर त्यांनी पुत्रवत प्रेम केले.

१९५५ साली काशी मुक्कामी त्यांची प्रकृती खालावली त्यांनी त्यांच्या प्रमुख शिष्यांना काशीला बोलावले. देह त्यागानंतर स्वतःचे पार्थिव दगडाच्या पेटीत ठेवून गंगेत प्रवाहित करण्याची आणि त्यानंतर कालीमातेची पूजा करून ५४ कुमारीकांचे पूजन करण्याचे सर्वाना सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वाना दिव्य अनुभव येईल असे आश्वासन दिले.

swami-loknath-teerth-charitra९ फेब्रुवारी १९५५ या दिवशी प.प. स्वामी महाराजांनी महाक्षेत्र काशी येथे देह त्याग केला. त्यांच्या सूचनेनुसार ५४ कुमारीकांचे पूजन झाल्यावर मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीतून एक ज्योत निघाली आणि प्रत्येक कुमारिकेच्या डोळ्यांसमोरून ती तरंगत सर्वाना दर्शन देवून परत कालीमातेच्या मूर्तीत अंतर्धान पावली.

प.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी प्रवाहित केलेली महायोगाची गंगा परंपरेतील महापुरुषांनी अखंड प्रवाहित ठेवली आहे. प.पू. श्रीगुळवणी महाराज यांच्या द्वारे ती महाराष्ट्रात अवतीर्ण झाली. ‘श्रीवासुदेव निवास’ हे महायोग परंपरेतील मूळपीठ आहे.

प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचे चरित्र श्री वासुदेव निवासने प्रकाशित केले आहे. लेखक श्री. अ. सि. पोटभरे  

<< गुरुतत्व पृष्ठावर जा