© 2020 All rights reserved
योगीराज श्रीगुळवणी महाराज चरित्र सारांश
प.पू श्री वामनराव गुळवणी महाराजांचा जन्म, कोल्हापूरच्या जिल्ह्यातील कुडुत्री वा (कुडुची) या लहानश्या खेड्यात गुरुवार, २३ डिसेंबर १८८६ साली झाला. यांचे घराण्यात पूजा-पाठ व्रत वैकल्ये, उपासना, जप-तप व इतरही वैदिकधर्म विधी सतत चालत असत, अतिथि-अभ्यागतांचे मनोभावे स्वागत, साधू-संत-सत्पुरुष संन्याशांच्या सत् संगाची आवड, धार्मिक सात्विक वृत्तीने करावयाचा प्रपंच, अशा वातावरणात बाल वामनच्या मनांवर सुसंस्कार घडविले जात होते. महाराजांचे वडील वेदमुर्ती दत्तंभट यांची दिनचर्या तपस्व्यासारखी विरक्त व अनासक्त अशी होती.
माता उमाबाई तर श्री भगवान् दत्तात्रेयांच्या निस्सीम उपासक, परम श्रध्दाळू, धार्मिक, शुद्ध व सात्विक अंत:करणाच्या होत्या. त्यांना दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन देऊन, त्यांच्या ओटीत “श्री” नी एका कागदामध्ये “अष्टगंधयुक्त” अशा चांदीच्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. आजही त्यांचे नित्यपूजन ‘श्री वासुदेव निवास’ आश्रमात सुरु आहे. अशा माता-पित्यांच्या उदरी जन्म येण्यास अनेक जन्मांची पुण्याई पदरी असलेलाच जीव धावून येतो. योगसामर्थ्य, संपन्नता, आचारनिष्ठा व महान् सद्गुरूभक्त सत्पुत्र उदरीं येणे हा योगही ईश्वरी संकेतानुसारच, माता-पित्यांच्या तीव्र उपासनेची फलश्रुती म्हणूनच लाभत असतो.
बालपणापासूनच महाराजांना पूर्वसंस्कारानुसार कलेची उपजत आवड होती. ती पाहूनच त्यांना चित्रकलेचे शिक्षण देण्यात आले. चित्रकलेच्या फर्स्ट, सेकंड व थर्ड ग्रेडच्या परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे नोकरी करून, दोन हातांचे चार हात करून चांगला प्रपंच करावा अशी मातेची व वडील बंधूंची इच्छा होती. परंतु विश्वनियंत्याच्या योजनेप्रमाणे ‘विश्वाचा प्रपंच’ करण्याचे महाराजांचे प्रारब्ध होते. ती विश्वजननी त्रिकालज्ञ असल्यामुळे, त्यांच्या प्रारब्धात अनेक मुमुक्षु-साधकांच्या शाश्वत कल्याणाचे बीज सांठवलेले होते.
१९०७ साली प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांचा मुक्काम नरसोबाच्या वाडीला असतांना, महाराजांनी एका श्लोकबद्ध हारांत श्री दत्तप्रभूंचा फोटो तयार करून, स्वामींना अर्पण केला. स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी महाराजांना आशीर्वादयुक्त हातात बांधण्यासाठी “मंत्रसिद्धप्रसाद” पेटी तयार करून दिली. चातुर्मासासाठी पवनी येथे प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांचा मुक्काम असताना श्रीगुळवणी महाराज आपल्या मातोश्री व भगिनी गोदुताई यांना घेऊन पवनीस गेले व तेथे स्वामींनी या तिघांनाही अनुग्रह दिला. तो अनंत चतुर्थीचा दिवस होता.
श्रीस्वामी महाराजांचा चातुर्मास हावनूर येथे असल्याचे समजल्यावर, त्यांना भेटण्यासाठी प्रवासाचे पैसे नसल्याने श्रीगुळवणी महाराजांनी पायी प्रवास सुरु केला. वाटेत उन्ह, तहान, भूक सारे विसरून, प्रवासात घोंगडी विकून मोठ्या कष्टाने ते स्वामी महाराजांपर्यंत येऊन पोहचले. श्रीसद्गुरूंच्या पावन दर्शनाने सारे श्रम विसरले गेले. याच मुक्कामात महाराजांना स्वामींची सेवा करण्याची चांगली संधी मिळाली. स्वामींनी महाराजांना आसने, प्राणायाम, इत्यादि शिकवले व अजपाजपही सांगितला. पुढे औदुंबर येथे जाऊन श्री महाराजांनी श्रीदत्तमालामंत्राचे पुर:श्चरण केले. श्रीक्षेत्र गरुडेश्वरी स्वामींनी महाराजांना धौती क्रिया शिकवली. याच ठिकाणी स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी महासमाधी घेतली.
बार्शी व पुणे येथील विद्यालयामध्ये चित्रकला शिक्षकाची नोकरी करीत असताना श्रीगुळवणी महाराजंच्या अंतरंगाची कुणालाही फारशी ओळख झालेली नव्हती. ते नोकरीव्यतिरिक्त वेळात सद्ग्रंथांचे वाचन, गुरुचरित्राचे पारायण, पूजा, योगाचा अभ्यास करीत असत. सहकाऱ्यांना व शेजाऱ्यांना ते एक सामान्य ड्राईंग मास्तरच वाटत असत. एकांतप्रियता, मितभाषी स्वभाव, शास्त्रानुसार आचरण, देव-गुरुंवरील अमर्याद श्रद्धा इत्यादि अनेक गुणांनी ते संपन्न झालेले होते. ते अत्यंत साधे राहात असत.
योगाचा पुढील अभ्यास करण्यासाठी ते आपले गुरुबंधु, गोविंद महाराज पंडित यांचे कडे मातेसह होशंगाबाद येथे आलेले असताना योगा-योगाने तरूण बंगाली संन्यासी प.प श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांची भेट घडली. स्वामी श्रीलोकनाथतीर्थांनी महाराजांची योग्यता, अभ्यास आणि अधिकार इत्यादि सर्व पाहून त्यांना शक्तिपात दीक्षाच केवळ दिली नाही, तर शक्तिपात दीक्षा इतरांनाही देण्याचा अधिकारही दिला.
पुण्याच्या २०, नारायण पेठेतील गोवईकरांच्या चाळीतील भाडयाच्या दोन खोल्याच्या घरात एक शक्तीसंपन्न, गुरुकृपा संपन्न, महात्मा राहात आहे असे कित्येक दिवस शेजाऱ्यांना व इतर कुणालाही माहित नसावे, हे आश्चर्यच नव्हे काय? त्याचे कारण महाराज स्वतःच प्रसिद्धी विन्मुख होते. कला क्षेत्रातही त्यांनी आपला फारसा गाजावाजा होऊ नये म्हणून फार दक्षता घेतली होती. परंतु कस्तुरीमृगाने कितीही लोकेषणा टाळण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या नाभीकमलामधील कस्तुरी थोडीच गप्प बसते? ती आपल्या ईश्वरदत्त सुगंधाचा प्रभाव पसरून कीर्ती फैलावितेच. नागपूरचे पं. त्रंबकशास्त्री खरे यांनी गोरखपुरच्या कल्याणच्या “योगांक” या विशेष अंकातून महाराजांची महाराष्ट्रातील वेध दिक्षेचे प्रणेते म्हणून स्पष्ट प्रसिद्धी दिली. या प्रसिद्धी नंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखिल भारतातून अनेक जिज्ञासू, मुमुक्षु, साधकांची पुण्याकडे रीघच लागली होती.
यदृच्छेने श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज व श्री गुळवणी महाराज यांचा संबंध आला. त्या उभयतांचे एकमेकांवर आत्मीयतेने निस्सीम प्रेम जडले, त्यामधून अनेक साधकांच्या भाग्योदयाचीं बीजे उत्पन्न होऊन, आज गुरुमार्गाचे उन्नत स्वरूप पहावयास मिळते. श्रीमहाराजांनी स्वामींबरोबर अनेक तीर्थयात्रा केल्या. त्यांनी स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या ग्रंथांचे बारा खंडात प्रकाशन केले. गुरूंच्या स्मृत्यर्थ पुणे येथे श्री वासुदेव निवास आश्रम उभारला. असंख्य देवस्थाने, तीर्थक्षेत्रे, धर्मशाळा इत्यादींसाठी मुक्त हाताने दानधर्म केला. भैमरथी शांति, सहस्र-चंद्र-दर्शन शांति, रौद्री शांति, वैदिक धर्मानुष्ठाने, यज्ञ, स्वाहाकार, इत्यादी उत्सवातून लोकांच्या श्रद्धा अधिक बळकट केल्या. प्रकृती बरी नसायची, अनेक दुर्धर व्याधींचा त्रास होत असे, तथापि हा प्रारब्धाचा भोग स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून आनंदाने भोगला व १५ जानेवारी १९७४ रोजी आपला देह विसर्जित करून ते अव्यक्तात विलीन झाले.
सदगुरू योगीराज श्रीगुळवणी महाराज यांचे चरित्र चार खंडांमध्ये श्रीवासुदेव निवासने प्रकाशित केले आहे. लेखक: श्री अ. सि. पोटभरे