© 2020 All rights reserved
प. प. श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज चरित्र सारांश
प.प. श्रीश्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे इतिहास काळातील पहिले अवतार समजले जातात. श्रीगुरुचरित्रातील अध्याय ५ व ९ अशा दोनच अध्यायात त्यांच्या अवतारा विषयी माहिती आहे. त्यांचा काळ साधारण पणे १३२० ते १३५० असावा. त्यांचे जन्मस्थान पीठापूर (आंध्रप्रदेश) सध्या हे “पिठापुरम्” या नावाने ओळखले जाते. त्यांच्या पित्याचे नाव आपळराज आणि मातेचे नाव सुमता. त्यांची पत्नी ही सदैव पतिसेवेत मग्न असलेली आणि अतिथी लोकांची मनोभावे पूजा करणारी होती. या दाम्पत्याच्या घरी अमावस्येच्या दिवशी श्राध्दविधी असताना, ब्राह्मण भोजनापूर्वी घरी आलेल्या एका अवधूताला सुमाताने भिक्षा घातली.
प्रसन्न झालेल्या अवधुताने सुमताला सांगितले “माते, तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग, ती इच्छा सफल होईल (हा अवधूत म्हणजे प्रत्यक्ष गुरु दत्तात्रेयच होत असे गुरुचरित्रात सांगितले आहे) दत्तात्रेय स्वरूप अवधूताला सुमतेने साष्टांग प्रणिपात केला आणि त्याची मनोभावे प्रार्थना केली. ही प्रार्थना अवधूताने मान्य केली व तो अदृश्य झाला. त्या आशीर्वादावरील श्रद्धेने कालक्रमणा करीत असताना सुमतेला गर्भ राहिला आणि यथाकाल तिच्या घरी पुत्र जन्माचा सोहळा साजरा झाला. ब्राह्मणांनी भविष्य वर्तविले की “हा महान तपस्वी आणि दीक्षाकर्ता जगद्गुरू होईल.” दत्तात्रेयाच्या आशीर्वादाने जन्म झाला म्हणून मुलाचे नाव “श्रीपाद” ठेवले.
श्रीपाद सात वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याचे मौजीबंधन केले. मौजीबंधनाच्या वेळेपर्यंत त्यांचे वेदाध्ययन पूर्ण झाले होते. सोळावे वर्ष लागल्यावर मातापिता त्यांच्या विवाहाचा विचार करू लागले. या घटनेनंतर श्रीपाद श्रीवल्लभानी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि उत्तरेला यात्रेला जाण्याची अनुज्ञा मातापित्यांच्या जवळ मागितली. अवधूताच्या आशीर्वादाने झालेला हा पुत्र विरक्तच राहणार, याची जाणीव झाल्यावर हताश होऊन त्यांना कळवळून म्हणाली: बाळ आमचा जीव तुझ्यावर विसंबून होता. आता आम्ही म्हातारपणी कुणाच्या आधाराने दिवस काढायचे? हे तुझे दोन लंगडे-पांगळे आणि आंधळे भाऊ, त्यांना आता कुणी पोसावे? आईचे हे बोलणे ऐकल्यावर श्रीपादांनी आपल्या दोघा अपंग भावाकडे अमृतदृष्टीने पाहिले आणि चमत्कार झाला की ते दोघे अव्यंग बनले व त्याच बरोबर प्रज्ञाही प्राप्त झाली. अशा रीतीने मातापित्यांची चिंता कायमची दूर झाली.
या गोष्टीनंतर मात्या-पित्याचा निरोप घेऊन श्रीपादांनी पीठापूर सोडले आणि उत्तरेकडे यात्रा सुरु केली. जगन्नाथपुरी, काशी या तीर्थक्षेत्रात भ्रमण केले. उत्तर यात्रा पूर्ण झाल्यावर ते दक्षिणेत गोकर्ण महाबळेश्वर येथे आले व तिथे ३ वर्षे गुप्त निवास केला. त्यानंतर ते श्रीशैलावर गेले. तेथे चार महिने राहून पुढे निवृत्तीसंगमावर कृष्णेच्याकाठी कुरवपूर (आंध्रप्रदेश) नावाच्या गावी आले. कुरवपूरला ज्या दोन घटना घडल्या त्याचा संबंध श्रीपादांच्या उत्तर अवताराशी असावा…त्या दोन घटना म्हणजे:
पहिली घटना: कुरवपूर येथे राहणाऱ्या एका वेदशास्त्र संपन्न ब्राम्हणाच्या अंबिका नामक पत्नीच्या मतीमंद मुलाबद्दल आहे. एकुलत्या एक पुत्राच्या जडमूढ अवस्थे कडे बघून ब्राम्हणाने इहलोक सोडला. त्यानंतर अंबिका आणि तिचा मूढ पुत्र यांची स्थिती अधिकच शोचनीय व समाजात निंदास्पद झाली. ह्या सगळ्याला त्रासून माय- लेकरांनी कृष्णानदीमध्ये चिरविश्रांती घायची ठरविली. त्याचवेळी श्रीपाद श्रीवल्लभ तिथे स्नान करताना आढळले. माऊलीने त्यांना वंदन करता श्रीपाद श्रीवल्लभ करुणेने ओसंडू लागले आणि तिच्या मूढ पुत्राच्या मस्तकावर कृपाकर ठेवून त्याला ज्ञान संपन्न बनविले. गुरुचरित्रकारांची अशी श्रद्धा आहे कि हि अंबिका म्हणजे लाड कारंज्याची अंबाभवानी व तिचा पुत्र म्हणजे श्रीनृसिंह सरस्वती.
दुसरी घटना: कुरवपूर येथील निवासा मध्ये श्रीपादगुरु नित्य गंगास्नानाला जात, तेव्हा तेथे धुणे धूत असलेला एक रजक त्यांना भक्तिभावाने वंदन करीत असे. पुढे पुढे त्याला श्रीगुरूंच्या सेवेचे वेड लागले. तो त्यांच्या मठाची झाडलोट करी आणि त्यांच्या चरण सेवेत दिवस काढी. एके दिवशी वसंतक्रीडा करण्यासाठी म्लेच्छ राजा राजपरिवारासह नावेतून विहार करीत होता. तेव्हा रजकाने त्याचे वैभव पाहिले व त्याच्या मनात स्वतः विषयी विषाद निर्माण झाला. श्रीगुरुंनी त्याची मन:कामना मनोमन जाणली व तसा आशीर्वाद दिला. अशा काही चमत्कारानंतर श्रीपादगुरु यांनी कुरवपूरीच अश्विन वद्य १२ या दिवशी निजानंदी गमन केले. हाच दिवस आजही “गुरुद्वादशी” म्हणून पाळला जातो.